पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार होते. पंरतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला.
शरद मोहोळ याच्यावर नेमका कोणी हल्ला केला? याबाबत पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. मोहोळ याच्यावर त्याच्या गॅंगसोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याची पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस मुन्ना पोळेकर आणि इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद मोहोळ याच्यावर त्याच्याच साथीदाराने हल्ला केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
शरद मोहोळ याच्यावर हल्ला कशामुळे झाला ?
जमिनीच्या खरेदी-विक्रीवरून आठ दिवसांपूर्वी साहिल पोळेकर आणि शरद मोहोळ याची चांगलीच बाचाबाची झाली होती, याच वादातून हा खून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मुळशी तालुक्यातील मुठा हे शरद मोहोळ याचे गाव आहे. या गावात त्याच्याच आसपास पोळेकरची जमीन आहे. या जमिनीच्या खरेदी विक्रीवरून वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वी शरद मोहोळने साहिल पोळेकरला बोलवून त्याला या प्रकरणात मारहाणही केली होती, त्याचाच राग धरून पोळेकरने शरद मोहोळची हत्या केली आहे, असं सांगितलं जात आहे.