पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पाच जानेवारी 2024 रोजी कोथरूड परिसरात हत्या झाली. या हत्या प्रकरणात पोलीस तपासातून दररोज नवीन महिती समोर येत आहे. पोलिसांच्या तपासात मारेकऱ्यांनी शरद मोहोळ याची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी झाडावर गोळीबारचा सराव केल्याची माहिती समोर आली होती. ऑक्टोबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यात रात्री १ वाजता मुळशीमधील हाडशी येथे गोळीबाराचा सराव केला होता. झाडाच्या बुंध्यावर सहा गोळ्या झाडल्याचे मारेकऱ्यांनी सांगितले. त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस झाडाचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी गेले. परंतु, घटनास्थळावर झाडच नाही. या प्रकरणी तपासातून आणखी काय बाहेर येणार? याकडे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी केली झाडाबाबत चौकशी
गोळीबार केलले झाड ज्या जागेत होते, त्या ठिकाणी पोलिसांना मिळाले नाही. यामुळे पोलिसांनी जागेचे मुळ मालक सचिन अनंता खैरे यांच्याकडे याबबत चौकशी केली. त्यावेळी दहा महिन्यांपूर्वी बांधकामादरम्यान झाड तोडल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पुणे पोलिसांनी पौड पोलीस ठाण्यात बेकायेशीरपणे पिस्टल बाळगून त्यामधून फायरिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
खुनाच्या आधी बैठक
पोलीस तपासात शरद मोहोळ खून प्रकरणी विठ्ठल शेलार आणि फरारी आरोपी गणेश मारणे हे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी मोहोळच्या खुनाच्या एका महिना आधी बैठक घेतली होती, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. या प्रकरणात आतापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली आहे.
विठ्ठल शेलार आधीपासून रडारवर
आरोपी विठ्ठल शेलार हा कधीकाळी भाजपमध्ये होतो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सुरुवातीपासून पोलिसांच्या रडारवर होता. शरद मोहोळ याचा खून झाल्यानंतर तो पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत हजर झाला होता. त्यानंतर फरार झाला. अखेर पनवेलमधून त्याला अटक करण्यात आली.