पुणे : कुख्यात शरद मोहोळ याच्या खून प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर (वय-३१, रा. दत्तवाडी) याला मंगळवारी ६ फेब्रुवारीला सायंकाळी अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल १८ हजार ८२७ ऑडिओ क्लिपपैकी १० हजार ५०० ऑडिओ क्लिप तपासल्या आहेत. त्यामध्ये सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळून आल्या आहेत.
तपासादरम्यान साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यातील संभाषणात अभिजित मानकरचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर या वेळी उपस्थित होते.
आत्तापर्यंत १६ जणांना अटक
शरद मोहोळ खून प्रकरणात यापूर्वी साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे आणि गणेश निवृत्ती मारणे यांना अटक झाली असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे.
कोथरुडमधील सुतारदरा परिसरात ५ जानेवारी रोजी शरद मोहोळचा साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. या प्रकरणानंतर अवघ्या २४ तासाच्या आत गुन्हे शाखेने मारेकर्यांच्या आणि त्यांच्या कटामध्ये सहभागी असणार्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे अटकेतील आरोपींची आणि इतर काही जणांची संभाषणे झाली होती. अशा तब्बल तब्बल १८ हजार ८२७ ऑडिओ क्लिपपैकी १० हजार ५०० ऑडिओ क्लिप पोलिसांनी तपासल्या असून त्यापैकी ६ क्लिप या संशयास्पद आढळून आल्या आहेत.