पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) व इतर मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 50 टक्क्यांऐवजी 100 टक्के शिक्षण मोफत देण्याचा शासन निर्णय आहे. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खराडी येथील शंकरराव ऊरसळ फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थिनींकडून लाखो रुपयांची फी लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
खराडी येथील शंकरराव ऊरसळ महाविद्यालयात डी व बी फार्मसीचे शिक्षण दिले जाते. या महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे चौथ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका ओबीसी विद्यार्थिनीकडून 31 जुलै 2024 रोजी 25 हजार 866 रुपये फी घेतली आहे. तर शेवटच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एका विद्यार्थिनीकडून 1 ऑगस्ट 2024 रोजी 25 हजार 866 रुपये फी घेतली आहे. अशी एकूण 51732 रुपये फी घेतल्याचे पुरावे ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागले आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात, तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून राज्यातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती. मुलींचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क शासनाकडून भरले जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, फेब्रुवारी 2023 मध्ये याच शाळेतील एका लिपिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. चंद्रशेखर विठ्ठलराव गुंड असे आत्महत्या केलेल्या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रशेखर गुंड यांच्या पत्नीने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुंड यांना डोनेशन द्या, अन्यथा कामावरून काढून टाकू? असा दबाव आणून त्यांचा शाळेतील प्राचार्यांसह शिक्षकांनी छळ केला. या छळाला कंटाळून चंद्रशेखर गुंड यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद गुंड यांच्या पत्नीने दिली आहे. त्यानुसार यवत पोलीस ठाण्यात शंकरराव ऊरसळ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक भोसले, सोंडकर, काकडे व गोडसे (बर्गे मॅडम) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खराडी येथील शंकरराव ऊरसळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले यांनी मुलींना 100% शैक्षणिक शुल्क माफ असतानाही फी आकारल्याबद्दल अनेक पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. महाविद्यालयांमध्ये अशाप्रकारे शुल्क आकारणे, हे अन्यायकारक आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकाराची त्वरित दखल घ्यावी. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे घेतलेले शुल्क परत करण्यात यावे, अशी विनंती आहे.
चंद्रकांत वारघडे (संस्थापक/अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य माहिती सेवा समिती)