पुणे : पुण्याची शान असणारा शनिवारवाडा आज २९१ वर्षांचा झाला. अवघ्या पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शनिवारवाड्याबद्द्ल अभिमान आहे. छत्रपतींचे प्रधान असणाऱ्या पेशव्यांचा हा राजवाडा.
शंभू पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात बाळाजी विश्वनाथ भट यांचे चिरंजीव पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी या शनिवारवाड्याची उभारणी केली. पुण्यात एकदा शिकारीसाठी आलेल्या बाजीराव पेशव्यांना दृष्टांत झाला आणि तेव्हा त्यांनी मुळा मुठेच्या काठावर वाडा उभारण्याचे नक्की केले. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हा वाडा पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन वाडयाची रचना करण्यात आलेली आहे..
माघ शुद्ध तृतीया तिथीला म्हणजेच १० जानेवारी १७३० रोजी भूमिपूजन करून शनिवारवाडय़ाच्या बांधकामाला प्रारंभ केला होता. त्या दिवशी शनिवार होता म्हणून या वाड्याचे नाव शनिवारवाडा असे ठेवण्यात आले. २२ जानेवारी १७३२ रोजी वाड्याची वास्तुशांती झाली. त्यावेळी वास्तुशांतीला २३३ रुपये आठ आणे खर्च आला होता. जवळपास तीनशे वैदिकांनी वास्तुशांतीचे धार्मिक विधी केले. त्याकाळात १६,११० रुपये इतका खर्च हा वाडा बांधण्याकरीता आला.
शनिवारवाड्याची इमारत –
शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरुज आहेत. तटाला ९ बुरुज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी ‘पागेचा बुरूज’ आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत.
तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमध्ये असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यात दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १००० हून अधिक नोकर होते.
शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल –
हा नानासाहेब पेशव्यांनी १७५५ साली बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळी शंभर नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती, तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंज्यांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे.
पेशव्यांच्या खजिना –
पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१४०२ हिरे, ११३५२ माणके, २७६४३ पाचू, १७६०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा(फीरोजा), १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या(लहसुनीया) असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना दुस-या बाजीरावांनंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब (दुसरे) यांना मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते.
या महालात एकाच वेळी एक हजार लोक राहु शकत होते, अश्या प्रकारची सोय या वाडयात करण्यात आली होती.२७ फेब्रुवारी १८२८ ला या वाडयाला आग लागली आणि ती आग विझवण्याकरता त्यावेळी तब्बल ७ दिवस लागले. दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे. पण ही आग कशी लागली हे आज देखील एक गुढ आणि रहस्य बनुन राहीले आहे. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे. पुढे येथे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणाऱ्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली. हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्ली दरवाजा वाड्यातील मुख्य प्रवेशद्वार तर हजारी कारंजे हे विशेष आहेत.