पुणे: शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची तब्बल ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे (Shailaja Darade:) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना दोन महिन्यांपुर्वी अटक करण्यात आली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी त्यांचा जामीन मंजूर केला आहे. पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.
राज्यातील उमेदवारांना शिक्षक, आरटीओ पदावर, तलाठी पदावर नोकरी लावू तसेच टीईटी पास करून देऊ, असे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी शैलजा रामचंद्र दराडे (रा.पाषाण) यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर सात ऑगस्टला शैलजा दराडे यांना अटक झाली होती.