पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नात्यातील आणि मूळचे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील शाहीर दीनानाथ साठे-वाटेगावकर (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. पुणे जिल्हा परिषदेतून ते उप जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, चार मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
दीनानाथ साठे-वाटेगावकर हे शिक्षणासाठी १९५६ मध्ये वाटेगावहून पुण्याला आले. शिक्षण घेत असताना त्यांनी के. टी. मंगल विद्यार्थी मंडळातून टी. डी. गायकवाड, दादासाहेब पवार, शंकरराव मात्रे यांच्यासमवेत आपल्या सामाजिक कार्यास सुरुवात केली. खासदार अप्पासाहेब मोरे, खासदार देवराम कांबळे, आमदार तात्यासाहेब भिंगारदिवे यांना एकत्र आणत त्यांनी मातंग समाजाचे संघटन केले. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरीचा पगडा असलेल्या दीनानाथ साठे यांनी त्यांची शाहिरी जतन करण्यासाठी हातामध्ये डफ घेतला. १९६९ पासून ते अखेरपर्यंत त्यांनी शाहिरीचे शेकडो कार्यक्रम केले.