पुणे : चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे शिंदे गटाच्या आमदारांवर आरोप केला जातो. त्या बाबतीत कुठलाही ठोस पुरावा नसताना आरोप करणं हे चुकीचं आहे. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या शहाजी बापूने कष्टातून जमीन विकत घेतली. घर बांधलं असेल तर ते त्यांच्या डोळ्यात खूपत आहे, अशी खरमरीत टीका शिंदे गटाचे आमदार तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
सध्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या शिंदे गटाच्या नेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत. माध्यमातून बोलताना त्यांनी सातत्याने शिंदे गटाच्या आमदाराना लक्ष्य करताना त्यांच्यावर विविध स्वरूपाचे आरोप करत आहेत. त्यामुळे आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली.
शहाजी बापू यांनी बांधलेले घर, सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात खुपत असून कावीळ झालेल्या माणसाला सगळंच पिवळं दिसते असे म्हणताना शंभूराज देसाई यांनी जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सुषमा अंधारे शिवसेनेत येण्यापूर्वी काय बोलल्या होत्या याची आठवण करून द्यावी, असंही ते म्हणाले.
सुरज परमार प्रकरणात संजय राऊत यांनी हवेत तीर मारू नये. संजय राऊत यांच्याकडे आम्ही गांभिर्याने पाहत नाही. पत्राचाळ प्रकरणात तुम्ही फक्त जामिनावर सुटले आहेत. अनेक बाबी या प्रकरणात समोर येत आहेत.
त्यामुळे कुठल्याही विषयासंदर्भात काही माहिती असेल तर आमच्या यंत्रणेकडे द्यावी. आम्ही त्याची चौकशी करू, असेही शंभूराज देसाई यांनी म्हणताना खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला.