पुणे : इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी २० वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन २०२२ ते ११ एप्रिल २०२४ या कालावधीत काळेपडळ येथे घडला.
याबाबत काळेपडळ परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यावरून शुभम बबन राठोड (वय २०, रा. साईराम कॉलनी, काळेपडळ) याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार, आरोपी शुभम राठोड हा तक्रारदार मुलीच्या मैत्रिणीच्या ओळखीचा आहे. २०२२ मध्ये मुलीची इन्स्टाग्रामवर शुभम सोबत ओळख झाली. त्यानंतर दोघामध्ये बोलणं सुरु झालं. आरोपीने तिच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून जीवाचे बरे-वाईट करण्याची धमकी देत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या.
अशातच त्याने आपल्या आईला भेटवतो असे खोटे सांगून मुलीला घरी बोलवून घेतले. त्यावेळी मी तुझ्यासोबत लग्न करणार, असं म्हणत तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवेले.
दरम्यान, पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ करून शुभमने तिच्यासोबत बोलणे बंद केले. त्यानंतर शुभमने पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवताना चोरून फोटो काढलेला पीडित तरुणीच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन तिची बदनामी केली. हा प्रकार लक्षात येताच पीडित तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी शुभमविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.