पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षामधून शाळेत जात असताना एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अल्पवयीन मुलावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार गुरुवारी १ फेब्रुवारीला सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास मुंजाबा वस्ती ते शाळेच्या रस्त्यात घडला आहे. याबाबत धानोरी येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे दोघे एकाच शाळेत शिकत आहेत. त्यामुळे ते दोघे दररोज एकाच रिक्षातून शाळेत जातात. गुरुवारी सकाळी पीडित मुलगी रिक्षातून शाळेत जात होती. त्यावेळी रिक्षात आरोपी आणि त्याचा भाऊ बसले होते. अल्पवयीन मुलाने पीडित मुलीसोबत रिक्षामध्ये गैरवर्तन केले. दरम्यान, मुलीने तिला त्रास होत असल्याचे तिच्या आईला सांगितले. मात्र, आईने खेळताना लागले असेल असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष केले.
काही वेळाने मुलीला जास्त त्रास होऊ लागल्याने फिर्यादी यांनी मुलीकडे चौकशी केली. त्यावेळी तिने तिच्यासोबत रिक्षात घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. यावरून अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळी करत आहेत.