पुणे : पुण्यातील वारजे परिसरात आदित्य गार्डन सोसायटीत असलेल्या जलतरण तलावात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवांश पठाडे (वय ७) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील पठाडे कुटुंब सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. शिवांशचे आई- वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. या सोसायटीतील लहान मुलांसाठी असलेल्या जलतरण तलावात शिवांशला त्याच्या आई-वडिलांनी उतरविले होते. त्यानंतर पठाडे दाम्पत्य सोसायटीच्या परिसरात फेरफटका मारत होते.
पंधरा मिनिटांनी पठाडे दाम्पत्य जलतरण तलावाजवळ आले असता तो जलतरण तलावात आढळून आला नाही. शिवांशचा शोध घेण्यात आला तेव्हा तो पाण्यात बुडाल्याचा दिसला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.