कात्रज: कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाला अधिक गती देण्यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भूसंपादनासाठी सात नागरिकांनी प्रस्ताव दिले आहेत. पुलांसाठी आवश्यक २८० मीटर रस्त्याचे तातडीने भूसंपादन करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्यामुळे रुंदीकरणाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाच्या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ मध्ये मान्यता मिळाली आहे. मात्र, भूसंपादन न झाल्यामुळे ट्रीकरणाचा प्रश्न प्रलंबित होता. गेल्या वर्षभरापासून या कामाला काही प्रमाणात गती येऊ लागल्याची चिन्हे आहेत. राजस सोसायटी ते कोंढव्यातील खडीमशिन चौकादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. भूसंपादनासाठी २८० कोटी रुपये खर्च येणार होता. त्यापैकी राज्य सरकारने १४० कोटी रुपये महापालिकेला दिले आहेत. काही भागात समतल विलगकाचे (ग्रेड सेपरेटर), तसेच रस्तारंदीकरणाचे काम टप्प्याटप्यात सुरू आहे.
दरम्यान, संबंधित रस्त्यावर नियोजित पूल, समतल विलगकासाठी २८० मीटर जागांचे तातडीने भूसंपादन केले जाणार आहे. संमती दर्शविलेल्या जागामालकांच्या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही जागामालकांची बैठकही घेण्यात आली आहे. त्यांपैकी सात नागरिकांनी भूसंपादनाबाबत महापालिकेकडे प्रस्ताव पाठविले आहेत. तसेच, भूसंपादनाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे रस्तारंदीकरणाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.