लोणी काळभोर (पुणे): श्रीक्षेत्र थेऊरगाव-तारमळा ते काकडेमळा या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व डांबरीकरणासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडून तब्बल सव्वा सात कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून, रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती थेऊर ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज हिरामण काकडे यांनी दिली आहे.
श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) हद्दीतील थेऊर-तारमळा-काकडेमळा हा रस्ता साडेचार किलोमिटर लांबीचा असुन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सदर रस्त्याच्या सव्वा तीन किलोमीटर लांबीच्या या पहिल्या टप्प्यासाठी तब्बल सात कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. तर उर्वरीत रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पुढील काही दिवसांत पीएमआरडीएकडून आणखी निधी मिळणार आहे. आता पहिल्या टप्प्यातील रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे युवराज हिरामण काकडे यांनी “पुणे प्राईम न्यूज” शी बोलताना सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना युवराज हिरामण काकडे म्हणाले, थेऊर-तारमळा-काकडेमळा या रस्त्याला पीएमआरडीएकडून मंजुरी मिळाली आहे. गेली अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या कामाची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत होती. याच अनुषंगाने अखेर पीएमआरडीएकडून सदर रस्त्याची निविदा प्रसिद्ध झाली असून सव्वा तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामासाठी सात कोटी तीस लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. सदर रस्त्याचे रुंदीकरणासह डांबरीकरण होणार असून, सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी ड्रेनेज लाईनही करण्यात येणार आहे. यामुळे येथील दळणवळण अधिक सोयीचे होऊन, या परिसराचे सौंदर्य व मुल्यांकन वाढणार आहे. तसेच या भागाची प्रगतीही होण्यास मदत होणार आहे. थेऊर-नायगाव शिव रस्त्यानंतर, आता थेऊ मधील हे दुसरे मोठे रस्त्याचे काम असणार आहे.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने सदर रस्त्याचे काम मंजुर झाले आहे. पीएमआरडीएचे प्रमुख या नात्याने शिंदे यांनी या रस्त्याच्या कामाला भरघोस निधी दिला आहे. गेली अनेक दिवसांपासून या रस्त्यासंदर्भात त्यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. सदर रस्त्याला मंजुरी दिल्याबद्दल शिंदे यांचे थेऊर नागरिकांच्यावतीने आभार मानतो.
– युवराज हिरामण काकडे (सदस्य, ग्रामपंचायत श्रीक्षेत्र थेऊर).श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) हद्दीतील थेऊर-तारमळा-काकडेमळा या रस्त्याच्या कामाची निविदा पीएमआरडीएकडून प्रसिद्ध झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. थेऊर-नायगाव शिव रस्त्याप्रमाणे या रस्त्याचेही काम ३३ फुटांपर्यंत रुंदीकरणासह होणार आहे. याकामी सर्व स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे.
– कनिष्ठ अभियंता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA).