संतोष पवार
पळसदेव, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर पळसदेवनजीक असणाऱ्या सेवा रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठल्याने अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.
महामार्गावरील पळसदेव हे मोठी लोकसंख्या आणि बाजारपेठ असलेले गाव आहे. गावानजीक असणाऱ्या सेवा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी, व्यापारीवर्ग, दुचाकी वाहनांची, विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असते. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठलेले आहे. महामार्गावरून भरधाव वेगाने वाहनांची वाहतूक सुरू असते. सेवा रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने पाण्याचे डबके तयार झाले आहे.
सेवा रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत असून, यातून अपघातांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.