पुणे : कॅम्प परिसरातील भोपळे चौकाजवळ शनिवारी (ता. २) रात्री एका सराफ व्यावसायिकावर चाकूने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. त्यानंतर घटनास्थळी सोडलेल्या चप्पलच्या साहाय्याने पोलिसांनी यापैकी एका हल्लेखोराला अटक केली. या हल्ल्यामागील नेमके कारण आज उघडकीस आले आहे. आपल्या आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार केल्याची माहिती मिळत आहे. आईचा अपमान केल्याने सराफावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, युवराज अनिल गोरखे (वय २४, रा. वैदूवाडी, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी साथीदार सार्थक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय विमलचंद मेहता (वय ३८, रा. कुमार कॅसल सोसायटी, लष्कर) असे जखमी सराफाचे नाव आहे. याबाबत मेहता यांचा भाऊ मनोज (वय ३९) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोरखे याची आई मेहता यांच्याकडे कामाला होती. त्यावेळी विजय आणि गोरखेची आई यांच्यात वाद झाला होता. विजय यांनी आईवर चोरीचा आरोप केला होता. आईचा अपमान केल्याने गोरखे चिडला होता. संतप्त होऊन त्याने यापूर्वीही गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
दरम्यान, शनिवारी (ता. २) रात्री सव्वानऊच्या सुमारास विजय यांना आरोपींनी लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात अडवले. गोरखे आणि साथीदाराने त्यांच्यावर कोयता उगारला. विजय घाबरून पळाले. आरोपींनी पाठलाग करुन त्यांच्याव कोयत्याने वार केले. या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली होती. पसार झालेल्या गोरखेला पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके या घटनेचा अधिक तपास करत आहेत.