केडगाव : दौंड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होण्यासाठी दहा वर्षे लागली. परंतु, कुठल्याही गोष्टीला सुरू होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण यश मिळतेच हे आपण पाहिले. या यशाचे श्रेय आमदार राहुल कुल व येथील वकील संघटनांचे आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी सांगितले.
दौंड येथील दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन न्यायमूर्ती मोहिते डेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राहुल कुल, मुख्य अतिथी न्यायमूर्ती संदीप मारणे, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कालिदास नांदेडकर तसेच महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष राजेंद्र उमाप, वरिष्ठ स्तर न्यायालयाचे न्यायाधीश जोशी, ज्येष्ठ विधीज्ञ हर्षद निंबाळकर, ए. यु. पठाण, अविनाश आव्हाड, दौंड वकील संघाचे अध्यक्ष कैलास गायकवाड, दौंड, बारामती, इंदापूर, श्रीगोंदा वकील संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यावेळी उपस्थित होते.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, दौंड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होण्यासाठी दहा वर्षे लागले. परंतु, कुठल्याही गोष्टीला सुरू होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण यश मिळतेच हे आपण पाहिले. या यशाचे श्रेय आमदार राहुल कुल व येथील वकील संघटनांचे आहे. आपण जेव्हा म्हणतो की न्याय सर्वांसाठी, तेव्हा लोकांना त्यांचे हक्क मागण्यासाठी कोर्ट जवळ असणे गरजेचे आहे.
तसेच पूर्वी येथील लोकांना बारामती येथे जावे लागायचे आता हे काम दौंडलाच व्हावे, यासाठी राहुल कुल यांनी सदैव प्रयत्न केले. लोकांना आपल्या हक्काची जागृती झालेली आहे, होत आहे. त्यामुळे खटले वाढलेले आहेत. अशावेळी न्याय पायाभूत सोयी, सुविधा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. याकडे आपण पाहिले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण लोकांना न्याय देऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दौंड वकील संघटनेचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन साक्षी जैन, प्रणव भोईटे यांनी केले तर जिल्हा व सत्र न्यायाधीश कालिदास नांदेडकर यांनी आभार मानले.
कोर्ट म्हणजे न्यायाचे मंदिर
कोर्ट म्हणजे न्यायाचे मंदिर आहे. इतके मोठे स्थान कोर्टाला दिले आहे. त्यामुळे न्याय देण्याची जबाबदारी फक्त न्यायाधीशांवर नसते तर ती समानपणे वकिलांवर सुद्धा असते. एखाद्या केसमध्ये वकिलाने जर एखादा मुद्दा प्रभावीपणे मांडला तर न्यायाधीशाला सुद्धा विचार करण्यासाठी प्रवृत्त व्हावे लागते आणि त्यामधूनच कायदा तयार होतो, असे राहुल कुल यांनी सांगितले.
अशीलाला मिळणारा न्याय तुमच्यावर अवलंबून
युवा वकिलांना सल्ला देताना न्या. रेवती मोहिते डेरे म्हणाल्या की, ”तुमच्याकडे ज्येष्ठ वकील आहेत, त्यांना अनुभव आहे त्यांचे मार्गदर्शन घ्या. कोणती पुस्तके वाचली पाहिजेत, केस कशी चालविली पाहिजे. कारण अशीलाला मिळणारा न्याय तुमच्यावर अवलंबून आहे हे लक्षात घेतले पाहिजे”.