पुणे : शिरपूर (जि. धुळे) येथील सिव्हील इंजिनिअर साथीदारासह पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली असून, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्याकडून २७ किलो ३२५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी हरीओम संजय सिंग (वय २१, रा. बी.एस.एन.एल. टॉवर मागे, मोहाडी, धुळे), करण युवराज बागुल (वय २३, रा. पद्मावती कॉलनी, मांडाळ शिवार, ता. शिरपूर, जि. धुळे) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४ लाख ८३ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यामध्ये २३ किलो ९० ग्रॅम किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ व २२ हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिंग हा इलेक्ट्रीकची कामे करतो तर बागुल हा सिव्हिल इंजिनिअर असून, दोघांवर शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी आणलेला गांजा हा आंबेगाव बूद्रूक येथे राहणारा साथीदार वसंत सुभाष क्षिरसागर (वय ३०, श्री निवास अपार्टमेंट, आंबेगाव बूद्रूक) याला पुणे परिसरात विक्रीला देण्यासाठी आणल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून क्षिरसागर याचा शोध घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्याजवळ ८४,७०० रुपये किमतीचा ४ किलो २३५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, ६२ हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन, एक इलेक्टॉनिक वजन काटा व रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा बंच आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपींविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक झेंडे करीत आहेत.