बापू मुळीक / सासवड : स्त्रीचा संघर्ष पोटातून सुरू होतो, तिला मुलगी, पत्नी, आई, आजी या सगळ्या भूमिकांतून जावे लागते, तरीही शुन्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद फक्त स्त्री मध्ये असते, असे प्रतिपादन सासवड पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांनी केले आहे. सासवड येथील स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने “तु ही दुर्गा” पुरस्कार वितरण सोहळ्यात पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
सासवड येथील अजित नागरी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला परिवर्तन परिवाराचे समीर जाधवराव, अनुसया को ऑपरेटिव्ह मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्टच्या संचालिका सानिका अजिंक्य टेकवडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील नऊ कर्तृत्ववान महिलांचा या प्रसंगी “तु ही दुर्गा” स्वरुपात शाल व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
वाघापुरच्या शेतकरी मनीषा भाऊसो कुंजीर, डोणजे येथील सामाजिक कार्यकर्त्या आशाबी यासिन शेख, परिंचे गावच्या रहिवाशी व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सेवानिवृत कर्मचारी विजया दिलिप जाधव, सासवडच्या पोलिस खात्यातील कर्मचारी यशस्वीनी मीलन कदम, गुरोळी गावच्या आदर्श शिक्षिका सुरेखा अनंता जाधव, सासवड येथील पुजा साहित्याची विक्री करणाऱ्या मनीषा गणेश चौधरी, सासवडच्या फरसाण व्यवसायिक जयश्री रामदास गिरमे, पांगारे येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम पाहणाऱ्या सुरेखा शिवाजी काकडे व सासवडच्या जेष्ठ गृहिणी लक्ष्मीबाई अंकूश जगताप यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, गेली तीन वर्षे हा पुरस्कार वितरण कार्यक्रम करतं असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी सांगितले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष धनंजय जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवरी येथील मोहिनी लोणकर यांनी केले, तर सन्मान पत्राचे वाचन डॉ. भारती जगताप यांनी केले.