-बापू मुळीक
पुरंदर (पुणे) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत नीरा शिव तक्रार येथील रेवती बाळासाहेब भोसले या तरुणीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. पुरंदर तालुका भाजपा सरचिटणीस बाळासाहेब भोसले यांची रेवती ही मोठी कन्या आहे.
तिच्या या यशाबद्दल पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम दादा जगदाळे व नारायणपूरच्या दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. यावेळी वकील शिवाजी कोलते, ग्राहक संघाचे रामदास मेमाणे, भाजपा नेते योगेंद्र माने, बाळासाहेब भोसले आदी उपस्थित होते.
रेवती भोसले हिचे प्राथमिक शिक्षण नीरा शिव तक्रार येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. दहावीचे शिक्षण विद्या मंदिर तर पुढील शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीसीएसमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली, पण त्यात यश आले नाही. घरची परिस्थिती बेताची पण अधिकारी होण्याचे स्वप्न होते. आणि त्यासाठी घरच्यांनी पाठिंबा दिला. पुढे तिने निश्चय केला की आता एकदा या परीक्षेला सामोरे जायचे. पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागून रोज 14 तास अभ्यास केला.
दरम्यान, पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बीसीएससी केल्यानंतर तिने लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पण त्यात यश आले नाही, त्यानंतर पुन्हा अभ्यास करता दुसऱ्या प्रयत्नात रेवतीने यश मिळवले, रयत प्रबोधिनीचे उमेश कुदळे, कोल्हापूरचे सरदार डिस्टन संदीप नवले यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे या परीक्षेत यश मिळाले असल्याचे रेवती भोसले यांनी सांगितले.
आई- वडिलांनी संपूर्ण स्वातंत्र्य आणि आर्थिक पाठिंबा दिला. इंदिरा गांधी आणि आई वडील हे माझे आदर्श आहेत. महिला बचत गटांसाठी काम केलेले होते. ग्रामपंचायत सदस्य म्हणून आत्मविश्वास मिळाला होता. त्यामुळे अधिकारी होईल याची खात्री होती. चार वर्ष स्मार्टफोन, समारंभ यांचा पूर्ण त्याग केला. खासगी शिकवणीची गरज पडली नाही. भावाने मैदानी चाचणीत, बहिणीने लेखी परीक्षेसाठी मदत केली.
– रेवती भोसले, पोलीस उपनिरीक्षक, नीरा, (ता. पुरंदर)