संतोष पवार / पळसदेव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत १४ / १७ वर्षाखालील मुलींच्या शालेय विभागीय कबड्डी स्पर्धा रत्नाई महाविद्यालय राजगुरुनगर (ता. खेड) येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत पळसदेव तालुका इंदापूर येथील एस बी स्पोर्टस् अकॅडमीच्या कबड्डीपटुंनी 17 वर्षीय मुलींच्या वयोगटात पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळविला.
वर्षा बनसुडे , समृध्दी बनसुडे, पुजा घनवट, रचना बांडे, अमृता शेलार, ऋतुजा भुजबळ, आरती घनवट, अंजलिका गाढवे या खेळाडुंची पुणे विभागातुन प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचबरोबर १४ / १९ वर्षीय वयोगटातील मुलींच्या विभागीय शालेय कबड्डी स्पर्धा अमरावती येथे संपन्न झाल्या.
या विभागीय कबड्डी स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत कादंबरी विपट, आरोही शिंदे, स्वरांजली शिंदे या कबड्डीपटुंनी प्रथम क्रमांक मिळविला तसेच १९ वर्षीय वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत प्रिया गाढवे या खेळाडूने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 21 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत तालुका क्रीडा संकुल कोपरी ठाणे (पूर्व) या ठिकाणी संपन्न होणार आहेत. राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष तथा प्रशिक्षक सागर बनसुडे सचिव विद्या बनसुडे व सहकारी प्रशिक्षक अमोल घनवट, प्रणव बनसुडे, अंकुश घनवट यांचे मार्गदर्शन लाभले.