राजेंद्रकुमार शेळके
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी तसेच हडपसर महाविद्यालयातील द्वितीय वर्ष फार्मसीच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्य कौशल्य उद्योजक संस्था व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या स्टार्टअप प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये ‘गॅस डिटेक्टिंग डिव्हाईस’ हा प्रोजेक्ट घेऊन विद्यार्थिनींनी दैनंदिन जीवनात आवश्यक व उपयोगी असणाऱ्या गॅस लिकेजची समस्या टाळण्यासाठी व त्यापासून होणारी हानी टाळण्यासाठी या प्रोजेक्टचे सादरीकरण केले. या वेळी एकूण १५०० प्रोजेक्टचे सादरीकरण झाले. त्यातून पाच प्रोजेक्टची स्टार्टअपसाठी निवड झाली आणि महाविद्यालयास प्रथम क्रमांक मिळाला.
या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अश्विनी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अश्विनी भोसले, प्रा. पल्लवी मोरे व प्रा. योगेश काक्रंबे व द्वितीय पदवी फार्मसीमधील सीतादेवी मोरया, भावना गिरमे, पल्लवी वाबळे या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन प्रोजेक्ट सादर केला.
या वेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार व प्रशासन सहसचिव ए. एम. जाधव यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या, मार्गदर्शक प्राध्यापक व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.