पुणे: काही दिवसांपूर्वी वडगाव शेरी भागात कोयता गँगच्या टोळीने कोयते उगारून आणि दगडफेक करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरले होते. तेव्हा सीमा वळवी या रणरागिणीने तप्तरता दाखवत एका गुंडाला पकडले. त्यांच्या या शौर्यामुळे पोलीस आयुक्तांकडून हवालदार वळवींचा सत्कार करण्यात आला.
कोयता गँगला भिडणाऱ्या पोलीस हवालदार सीमा वळवी यांचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कौतुक केले. वळवी यांचा पोलीस आयुक्तालयात रितेश कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
२४ डिसेंबर रात्री अकराच्या सुमारास चंदननगर पोलीस ठाण्यातील हवालदार सीमा वळवी कामावरुन घरी निघाल्या होत्या. तेवढ्यात कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या टोळक्याला वळवी यांनी पाहिले. वळवी यांनी तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या एका गुंडाला त्यांनी पकडले. वळवी यांनी आरडाओरडा केल्याने गुंडाबरोबर असलेल्या साथीदारांनी पळ काढला. मात्र, चंदननगर पोलिसांनी गुंडांचा पाठलाग करुन त्यांना २० मिनिटांत पकडले.
तपासात समेर आले की, रात्री वैमनस्यातून तीन जणांवर कोयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अनुज जितेंद्र यादव (वय १९), हरिकेश टूणटूण चव्हाण (वय १८), आकाश भारत पवार (वय २३), अमोल वसंत चौरघडे, संदेश सुधीर कांबळे (सर्व रा. वडगाव शेरी) यांना अटक करण्यात आली आहे.