लोणी काळभोर : हॉटेल व्यावसायिक व्यवसाय वाढीसाठी नवनवीन फंडे राबवित असतात. मात्र, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांनी व्यवसाय वृद्धीसाठी चक्क सुरक्षा रक्षकांच्या हातात लाईट स्टिक देऊन धोकादायकरित्या महामार्गावरच उभे केल्याचा धक्कादायक प्रकार पूर्व हवेलीत सुरु आहे. अशा प्रकारे सुरक्षारक्षकांना उभे केल्याने त्यांच्या जिवीतास धोका निर्माण होत आहे.
हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गालगत लहान-मोठी शेकडो हॉटेल्स आहेत. हॉटेलमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या भागातील हॉटेल व्यावसायिकांकडून एक नवीन फंडा राबवला जात आहे. व्यावसायिकांनी महामार्गावरच सुरक्षारक्षकांना उभे करून त्यांच्या हातात लाईट स्टिक दिली आहे. यामुळे हॉटेलला आर्थिक लाभ होत असेलही. मात्र, हे चक्र सुरक्षारक्षकांच्या जीवावर कधीही बेतू शकते.
अनेकदा बेरोजगार किंवा ५० ते ६० वयोगटातील ज्येष्ठ व्यक्ती कामाच्या शोधात पुण्यात येतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खाण्याची, राहण्याची सोय आणि थोडेफार पैसे मिळतील, अशी नोकरी ते शोधत असतात. अशा नागरिकांना पूर्व हवेलीतील अनेक हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम मिळते खरे; पण एक लाईट स्टिक आणि खुर्ची देऊन त्यांची ड्युटी महामार्गावरच लावली जाते. पुणे-सोलापूर महामार्गावरील अनेक हॉटेलचे सुरक्षारक्षक महामार्गालगतच लाईट स्टिक घेऊन हॉटेलमध्ये येण्यास सूचविण्याचा प्रयत्न करत असतात. पण, असे करणे त्यांच्याच जीवावर बेतू शकते.
सुरक्षारक्षकांना दिलेल्या लाईट स्टिकमुळे गाड्या पार्किंगला लावण्यासाठी दिशादर्शन करणे सोयीचे होते. मात्र, सुरक्षारक्षकांना चक्क सेवा रस्त्यावर अथवा महामार्गावरच लाईट स्टिक घेऊन बसविणे किंवा थांबविणे, हे धोकादायक ठरत आहे. त्यांच्या मागे कुटुंबाची, परिवाराची जबाबदारी असते. महामार्गावरील वाहनांची संख्या पाहता अपघाताचा धोका नाकारता येत नाही. अशा प्रकारची ड्युटी देवून जिवाशी खेळ करणे कितपत योग्य आहे, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
सुरक्षारक्षकांच्याच ‘सुरक्षे’चा प्रश्न
हॉटेल व्यावसायिकांनी स्वत:च्या फायद्यासाठी सुरक्षारक्षकांच्या हातात कोलीत दिल्यासारखे लाईट स्टिक दिले आहेत. नुसते दिले नाही तर त्यांना धोकादायकरित्या महामार्गावरच उभे केले आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. हॉटेल व्यावसायिकांनी अशा प्रकारे त्यांच्या जीवाशी खेळू नये. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.
– उमेश साळुंखे, स्थानिक नागरिक, लोणी काळभोर (ता. हवेली)
हडपसर, लोणी काळभोर वाहतूक विभागाला उद्या भेट देणार
हडपसर व लोणी काळभोर वाहतूक विभागाला उद्या भेट देणार आहे. तसेच वाहतूक विभागातील रस्त्यांची पाहणी करणार आहे. रस्त्यावर सुरक्षारक्षक लाईट स्टिक घेऊन उभे राहिलेले आढळून आले तर संबंधित अधिकाऱ्यांना हॉटेल व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देणार आहे.
– व्यंकटेश देशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग, पुणे