बारामती : किरकोळ वीजबिलावरून एका महिला वीज कर्मचाऱ्याची क्रूरपणे हत्या झाल्याची घटना महावितरण बारामती परिमंडलात घडली आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी महावितरण प्रशासनाने मोरगाव शाखा कार्यालयाला तातडीने सुरक्षारक्षक नेमले आहेत. तसेच सीसीटीव्ही बसविण्याचे आदेशही मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले आहेत.
मोरगावच्या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, असुरक्षेची भावना तयार होत आहे. त्यासाठी संघटना प्रतिनिधींकडून वीज उपकेंद्रांना सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांना मोरगाव उपकेंद्राला तातडीने तीन सुरक्षारक्षक देण्याचे आदेश दिले. तसेच मोरगाव शाखा व उपकेंद्राला सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय, परिमंडलातील संवेदनशील उपकेंद्राची माहिती गोळा करण्याचे निर्देशसुद्धा मुख्य अभियंता पावडे यांनी दिले आहेत.