लोणी काळभोर, ता. 19 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नामवंत शैक्षणिक संकुलातील एका सिक्युरिटी गार्डने हाऊसकिपींग महिलेचे बाथरूममधील फोटो काढले. मागील एक वर्षापासून ब्लॅकमेल करून शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत चंद्रकांत थोरात (वय 30, नायगाव ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील एका 32 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व कुंजीरवाडी परिसरात एप्रिल 2024 ते 18 एप्रिल 2025 यादरम्यान वेळोवेळी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एमआयटी शैक्षणिक संकुलात साफसफाईचे काम करतात. तर आरोपी श्रीकांत थोरात हा त्याच संकुलात सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. फिर्यादी या एके दिवशी डिझाईन कॉलेज मधील बाथरुम मध्ये गेल्या होत्या. तेव्हा आरोपीने चोरून त्यांचे फोटो काढले. त्यानंतर आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार ब्लॅकमेल केले.
दरम्यान, आरोपी थोरात याने फोटो डिलीट करतो म्हणून फिर्यादी यांना थेऊर फाटा येथे भेटायला बोलावले. आणि लॉजवर चल म्हणून शरीरसुखाची मागणी केली. मात्र फिर्यादी यांनी या मागणीस नकार दिलेल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले.
याप्रकरणी पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी श्रीकांत थोरात याच्या विरोधात भारतीय न्याय संहीता 2023 कलम 74, 75, 77, 78, 115 (2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करीत आहेत.
महिला कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
लोणी काळभोर येथील एमआयटी सारख्या नामवंत शैक्षणिक संकुलात जर या सारखा प्रकार घडत असेल तर या संकुलात काम करणाऱ्या महिला व हजारो विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या विनयभंगाच्या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी एमआयटी प्रशासन फोल ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या शैक्षणिक संकुलात काम करण्यासाठी महिला अथवा शिक्षणासाठी मुलींना पाठवावे की नको? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पडला आहे.