प्रदिप रासकर / निमगाव भोगी : शिरूर तालुक्यातील सर्व विकास सोसायटीच्या संस्थांना यापुढे ई हक्क प्रणाली द्वारे बोजा कमी करणे किंवा चढवणे या सारख्या नऊ प्रकारच्या नोंदी करण्याचे आधिकार प्राप्त झाले आहे. याबाबत शिरूर तहसिल कार्यालय येथे विविध कार्यकारी संस्थेच्या सचिवांची तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन करत याबाबतचे पुढील कामकाज चालू करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच ई हक्क प्रणाली वापरून आता यापुढे अगदी घरी बसून नऊ प्रकारचे फेरफार ऑनलाईन केले जाणार आहेत. यामुळे तलाठी यांचा तर वेळ वाचणारच आहे, परंतु त्यासोबतच शेतकऱ्यांचा देखील वेळ वाचणार आहे. शेत जमिनी संदर्भातील ऑफलाईन फेरफार बंद झाले असून यापुढे ई हक्क प्रणाली वापरून ऑनलाईन फेरफार करावे लागणार आहे. महसूल विभागामधील कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी शासकीय स्तरावरून ई हक्क प्रणालीमध्ये ई फेरफार प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.
यापुढे तुम्हाला जर फेरफार करायचा असेल तर त्यासाठी ई हक्क प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या आढावा बैठकीनिमित्त तालुक्यातील सर्व सोसायटीचे सचिव, तलाठी, मंडल अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालयीन कर्मचारी, नायब तहसिलदार प्रकाश मुसळे आदी उपस्थित होते.
ई हक्क प्रणाली वापरून नऊ प्रकारचे फेरफार करता येणार
१) वारसाची नोंद करणे.
२) ई – करार नोंदणी.
३) बोजा चढविणे.
४) बोजा कमी करणे.
५) मयताचे नाव कमी करणे.
६) अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे.
७) एकत्र कुटुंब कर्ताची नोंद कमी करणे.
८) विश्वस्तांचे नाव बदलणे.
९) संगणीकृत सात बारा मधील चूक दुरुस्ती करणे.