पुणे : पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पसार असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई आज सोमवारी (दि. १४) गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींपैकी दुसऱ्या २५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
अख्तर अली शेख (वय-२८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात यापूर्वी रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (१५ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेख, कनोजिया यांच्याबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील घाट तसेच टेकड्यांच्या परिसरात लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली होती. तसेच बोपदेव घाटामार्गे गेलेल्या ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १० ऑक्टोबर रोजी येवलेवाडी परिसरातून कनोजियाला अटक करण्यात आली होती.
अटक करण्यात आलेल्या कनोजियाकडे चौकशी केली असता त्याने आरोपी अख्तर शेख उत्तर प्रदेशातील प्रयागराजजवळ असलेल्या मूळगावी पसार झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, सुनील पवार, सुरेंद्र जगदाळे, पवन भोसले, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, दिलीप गोरे, अमोल राऊत आणि पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. सापळा लावून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.