पुणे : फळांचा राजा असलेल्या हंगामातील पहिल्या हापूस आंब्याची पेटी पुण्यात दाखल झाली आहे. पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत तब्बल २१ हजार रुपये इतकी आहे. यापूर्वी पुण्यातील बाजारात देवगड हापूस आला होता. आता पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी विकली गेली. ही पेटी बोली लावून विकल्यामुळे तिला सर्वोच्च दर मिळाला. पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीला २१ हजार रुपये किंमत मिळाली. म्हणजेच एका आंब्याची किंमत ४४० रुपये आहे.
आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. हापूस आंबा त्याच्या चवीमुळे देशात नाही तर विदेशातही भाव खातो. संक्रांतीनंतर हापूस आंबा पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे. मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला आहे. या आंब्याची आज विधीवत पूजा करण्यात आली. यंदा एक महिना आधीच रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली. सध्या आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे.
मार्केट यार्डमधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर त्यांनी रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आणली. रत्नागिरीपासून २० किलोमीटरवर असलेल्या पावस भागातील शेतकरी सुनील यांच्या शेतातील हे आंबे आहेत. या आंब्याच्या पेटीची किंमत २१ हजार रुपये होती. आज विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करण्यात आला. त्यानंतर आंब्याचा लिलाव झाला. बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्यांनी ही मानाची पेटी विकत घेतली. त्यामध्ये चार डझन आंबे आहेत.
महिन्याभरापूर्वी पुण्यात देवगड आब्यांची पहिली पेटी विकली गेली होती. देवगड येथील रज्जाद काची यांच्या बागेतील आंबा विकला गेला होता. त्यानंतर आता रत्नागिरी हापूस विकला गेला.