पुणे : पूना हॉस्पिटलजवळील पुलावरून मुठा नदीच्या पात्रात सोमवारी सायंकाळी एक शाळकरी मुलगा वाहून गेला आहे. अद्यापही वाहून गेलेल्या मुलाचा शोध लागला नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आज मंगळवारी (दि. ३०) सकाळपासूनच मुठा नदीपात्रात बुडालेल्या मुलाचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. मुठा नदीपात्रात संगम पूल, डेंगळे पुलाच्या परिसरात मुलाचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान सोमवारी (दि. २९) सायंकाळी पूना हॉस्पिटलजवळील नदीपात्रात एक शाळकरी मुलगा वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी तातडीने शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, नरात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही. खडकवासला धरणसाखळीत संततधार पाऊस सुरू असल्याने रविवारी रात्री मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर सोमवारी सकाळी भिडे आणि शिवणेमधील पूल पुन्हा पाण्याखाली गेला. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भिडे पुलावरून पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस तात्पुरते कठडे उभे करून पूल वाहतुकीस बंद केला होता.
पूना हॉस्पिटलजवळील एस. एम. जोशी पुलाच्या पात्रातही मोठ्या प्रमाणावर पाणी होते. तेथील एका बाकड्यावर एक शाळकरी मुलगा बसला होता. तो अचानक नदीपात्रात पडला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अनेकांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तातडीने अग्निशामक दलाला हा प्रकार कळवण्यात आला. या दलाच्या जवानांनी तातडीने मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु, रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरु केली आहे.