पुणे : पुण्यातील पीएमपी बसच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन वर्षात प्रशासनाला ७०६ कोटीचा तोटा सहन करावा लागला. ही त्रूटी भरून काढण्यासाठी तिकीट दरवाढ केली जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे. पीएमपीएमएल बसमध्ये दररोज सुमारे १३ ते १४ लाख प्रवासी पीएमपी सेवेचा लाभ घेत असतात. नागरिकांना सेवा देताना पीएमपीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे याचा भुर्दंड विनाकारण महापालिकेला सहन करावा लागतो. त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी पीएमपीने तिकीट दरात वाढ करावी अशी मागणी पीएमपीकडे करण्याची तयारी पुणे महापालिकेने सुरु केली असल्याचे समोर येत आहे.
गेल्या काही दोन वर्षात आर्थिक तोटा तब्बल ७०६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून या तोट्यातील ६०% रक्कम पुणे महापालिकेला ह्यावी लागते. त्यामुळे पालिकेवरील भारही वाढत आहे. त्यातच गेल्या ९ वर्षांपासून पीएमपीच्या तिकीट दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे पीएमपीने तिकीट दरात वाढ करावी अशी मागणी महापालिकेकडून केली जाण्याती शक्यता आहे.
पीएमपीकडे सध्या सुमारे २०८० बस..
पीएमपीकडे सध्या सुमारे २०८० बस आहेत. त्यापैकी फक्त १६०० ते १७०० बस दररोज सेवेत कार्यरत असतात. उर्वरित बस बंद अथवा देखभाल दुरुस्तीसाठी डेपोतच असतात. पुणे व पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या सुमारे ५० लाखांहून अधिक असताना दररोज ११ ते १२ लाखांहून अधिक प्रवासी दररोज पीएमपीने प्रवास करतात.
एसटी विभागात आता नव्याने १३४ ई-बस दाखल होणार..
दरम्यान, पुणे एसटी विभागात आता नव्याने १३४ ई-बस दाखल होणार आहेत. एसटीच्या ताफ्यातून लालपरी गाड्यांची संख्या कमी करून नव्या इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आली आहे. एसटी महामंडळाकडून डिझेलच्या गाडीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गांवरील इलेक्ट्रिक बसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच १३४ इलेक्ट्रिक बस पुणे विभागात दाखल होणार आहेत.