पुणे : पुण्यातील कात्रज परिसरात फाॅरेन सिटी एक्झिबेशनमध्ये विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांसोबत गेलेल्या आठ वर्षांच्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गणेश राजू पवार (वय-८, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे) असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील राजू पांडू पवार (वय-३७) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून फाॅरेन सिटी एक्झिबेशनचे संयाेजक, तसेच विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मोकळ्या जागेत फाॅरेन सिटी एक्झिबेशनचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यात लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळणी आहेत. गणेश हा त्याच्या वडिलांसोबत त्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी गणेश विद्युत पाळण्यात बसणार होता. त्यावेळी गणेशचा जाळीला स्पर्श झाला आणि विजेच्या झटक्याने तो जाग्यावरच कोसळला.
या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. बेशुुद्धावस्थेतील गणेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संयोजक, तसेच विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड अधिक तपास करत आहेत.