शिरूर (पुणे) : शिंदेवाडी (मलठण) येथील दिगंबर रामदास शिंदे (वय १६) या शाळकरी मुलाचा शाळेतून घरी येत असताना भरधाव टेम्पोच्या धडकेत गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत रामदास भिवा शिंदे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी ४०७ टेम्पो (एमएच १४ जेएल ६८९६) यावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
शनिवार, दि. १३ रोजी मौजे मलठण शिंदेवाडी गावचे हद्दीत मलठण-शिंदेवाडी रोडवर पावर हाऊसच्या जवळ शाळकरी मुलगा दिगंबर रामदास शिंदे हा मलठण बाजूकडून शिंदेवाडी बाजूकडे शाळेतून घरी येत असताना शिंदेवाडीकडून मलठणकडे जाणारा ४०७ टेम्पो (एमएच १४ जेएल ६८९६) यावरील चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने, अविचाराने, रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात चालवून मुलगा दिगंबर यास धडक दिल्याने अपघात झाला आहे. सदरच्या अपघातामध्ये मुलगा दिगंबर याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा व इतर ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा मार लागल्याने तो उपचारादरम्यान मयत झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. खेडकर व वारे करीत आहेत.