पुणे : आरोग्य विभागात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर अॅंब्यूलन्स खरेदीत 539 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे असं म्हणत रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
सक्तवसुली संचालनालयाने (इडी) बारामती अग्रो कंपनी वरील कारवाईनंतर रोहित पवार यांनी सरकार विरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली. मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यावर दूध, भोजन प्रकरणात पवार यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले होते. त्यापाठोपाठ सोमवारी घेतलेल्या दुसऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला याला आरोग्य मंत्री जबाबदार आहेत. एक तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी त्यांचे पद सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही फाईल पुढे पास कशी केली. देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ही फाईल जाते. त्यांनी दुर्लक्ष केलं का? साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला असून याला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे, असं रोहित पवार म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, निवडणुकीला फंड देण्यासाठी बीव्हिजी आणि सुमित कंपनी यांच्यावर मेहरबानी दाखवली जात आहे. हा लढा सामान्य व्यक्तीचा असून नियम कसे वळविण्यात आले, टेंडर डिझाईन करून वळवले गेले. या भ्रष्टाचाराबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागातील मोठ्या लोकांनी साडे सहा हजार कोटीचा घोटाळा केला आहे.
या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून राज्याला भिखारी केले आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी करावी. तसेच तानाजी सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
एका बाजुला बी व्ही जी बाबत अनेक तक्रारी आहेत, अनेक राज्यांत बी व्ही जी ब्लॅक लिस्ट कंपनी आहे. मात्र तरीही या कंपनीला कंत्राट देण्यात आले. स्पॅनिश कंपनी ब्लॅक लिस्ट आहे .सुमित कंपनीने या कंत्राटासाठीचे निकष ठरवले आणि त्यानंतर स्वतःच टेंडर भरले. काही दिवसांनी बी व्ही जी ला सहभागी करून घेतले, असे अनेक आरोप त्यांनी केले आहेत. मी या मुद्द्यावर आरोग्य मंत्र्यांशी जाहीर चर्चा करायला तयार असल्याचं ते म्हणाले. शिवाय या भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीत वापरण्यात येणार आहे, असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.