पुणे : जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ घोडेगाव येथे खवले मांजर या वन्यप्राण्याची तस्करी केल्याप्रकरणी ७ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी ६ आरोपींना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. जगात वाघाच्या खालोखाल सर्वात जास्त तस्करी खवले मांजराची होते. या प्राण्याची शिकार करणे, तस्करी करणे किंवा जवळ बाळगणे यासाठी सात वर्षे सक्त कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोहीदास पंढरीनाथ कुळेकर (वय ५५ वर्ष), कांताराम सखाराम वाजे (वय ४९, दोघे रा. भोमाळे, ता. खेड), सखाराम बबन मराडे (वय ४३, रा. पाभे, ता. खेड), सागर पुनाजी मेमाणे (वय ३१, रा. तळेराण, ता. जुन्नर), जालिंदर कान्डू कशाळे (वय ६५, रा. बडेश्वर, ता. मावळ), गीता नंदकुमार जगदाळे (रा. चव्हाणवस्ती कुमठे, ता. कोरेगाव, जि. सातारा), शांताराम सोमनाथ कुडेकर (वय ३२, रा. करंजाळे, ता. जुन्नर) अशा एकूण ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी ६ आरोपींना अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांच्यासमोर हजर केले. त्यांना वनकोठडी देण्यात आली आहे.
पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण, जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक (जुन्नर) संदेश पाटील, घोडेगाव आणि खेड वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वी करण्यात आली.
दरम्यान, वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैद्य वृक्षतोड याबाबत गैरप्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर संर्पक साधून माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहायक वनसंरक्षक पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी आपल्या आजूबाजूला वन्यजीव शिकार आणि तस्करी होत असल्यास वनविभागास कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.