सागर जगदाळे
भिगवण : शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित वनगळी (ता. इंदापूर) येथील एस बी पाटील महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी, डिप्लोमा व एमसीए अभ्यासक्रमासाठी चालू शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी विद्यार्थी प्रवेशाचा 700 चा टप्पा पार करून, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सर्वोत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रात्यक्षिकांवरती आधारित ज्ञान व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या माध्यमातून उच्चतम पगाराची नोकरी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील मुलांना उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम शिक्षण सोयी सुविधा निर्माण करून दिल्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या संस्थेने जागतिक व्यासपीठ करून दिले आहे.
एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सन 2009 पासून सुरू झाले. सध्या या महाविद्यालयामध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेले आहेत. या महाविद्यालयामध्ये कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, माहिती तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रम शिकवले जात आहेत.
या महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदे (नॅक ) कडून अ श्रेणी प्राप्त झाली आहे. या महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी, डिप्लोमा, एमसीएचे हजारो विद्यार्थी सध्या देश व परदेशात नामांकित कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम करीत आहेत. सदरच्या कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी प्राचार्य, ॲकडमिक डीन, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
डी फार्म, बी फार्म अभ्यासक्रमाची सुविधा
शैक्षणिक वर्ष 2021 22 पासून या संस्थेने औषध निर्माण शास्त्रामधील डिप्लोमा व डिग्री अर्थात डी फार्म, बी फार्म याचे देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा, उत्तम शिक्षण देण्याची सुविधा निर्माण करून दिलेली आहे. याचा देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गुणवत्तेसाठी उपयोग करून घ्यावा, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.