हडपसर (पुणे) : पुणे शहरात किरकोळ वादातून टोळक्याकडून दहशत माजविण्याचे प्रकार सुरूच आहेत. हडपसर परिसरातील पुरंदर कॉलनीत किरकोळ वादातून टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (ता. २४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत टोळक्याने दोन मोटारीची तोडफोड करून नुकसान केले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अजय अशोक जगदाळे (वय-३०, रा. पुरंदर कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राहुल बाळासाहेब तुपे, सचिन बाळासाहेब तुपे, शुभम विष्णू तुपे, गणेश, समर्थ पाचपुते, प्रसाद तुपे, अविनाश चौधरी, राजेश भिसे, अक्षय पाडुळे, चंद्रकांत कांबळे यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय जगदाळे आणि आरोपी तुपे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. शनिवारी मध्यरात्री तुपे आणि त्यांच्याबरोबर असलेले २० ते २५ साथीदार हे पुरंदर कॉलनी परिसरात आले. त्यावेळी टोळक्याने कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. फिर्यादी जगदाळे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच, जगदाळे यांच्या मोटारीची तोडफोड केली. तसेच या भागातील आणखी एका मोटारीची तोडफोड करून ‘आम्ही या भागातील भाई आहोत. मरायचे असेल तर पुढे या’, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.