शिरूर: पाण्याविना शेती फुलवता येईना. डोईवरचा कर्जाचा बोजा हटेना. तरीही त्यातून दुग्धव्यवसाय सुरू करून शेतीवर कर्ज काढत चार मुलांना उच्च शिक्षण देण्याचे धाडस शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील शेतकरी सावकार मुलमुले यांनी केले. त्यांचा मुलगा दत्तात्रेय हा एमबीबीएस होऊन एमडी करत आहे. दुसरा मुलगा काशिनाथ हा सिव्हिल इंजीनिअर आहे, तर समाधान हा बीडीएस चे शिक्षण घेत आहे. नुकताच थोरला मुलगा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाला आहे. शेती व शेतीपुरक व्यवसाय करत कष्ट करून जीवन जागणाऱ्या या शेतकरी बापाच्या कष्टाला उच्चशिक्षण व अधिकारी पदाच्या यशाने बहर आला आहे.
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई हे गाव घोडनदीच्या पाण्यामुळे विकसीत झाले आहे. परंतु, पारंपारिक शेती व पाण्यामुळे गरीब कुटूंबाची संख्या अधिक आहे. त्यातून शेतकरी सावकार मुलमुले देखील गरीब, कष्टाळू पण उच्च शिक्षणाबाबत त्यांचे विचार उच्च आहेत. पत्नीच्या संगतीने काबाडकष्ट करून त्यांनी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. वेळप्रसंगी शेतीला जोडधंदा म्हणून दु्ग्ध व्यवसाय त्यांनी सुरू केला. उच्च शिक्षण घेत असताना फी व मोठ्या प्रमाणात होणारा खर्च पेलवणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी शेतीवर कर्ज काढून चार मुलांना उच्च शिक्षण देण्याचे ठरविले.
योगेश, दत्तात्रय, काशिनाथ व समाधान या ४ मुलांनी आपल्या आई वडिलांचे काबाडकष्ट डोळ्यासमोर पाहत जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. थोरला मुलगा योगेश हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाला आहे. तर दुसरा मुलगा दत्तात्रय हा एमबीबीएसची पदवी प्राप्त करून अकोला येथे एमडी या उच्च पदवीचे शिक्षण घेत आहे. तिसरा मुलगा काशिनाथ हा पुण्यात सिव्हिल इंजिनिअर पदवी प्राप्त करून स्पर्धा परीक्षा देत आहे. चौथा मुलगा समाधान हा बीडीएसचे शिक्षण घेत आहे.
शेतकरी सावकार मुलमुले हे स्वभावाने शांत, प्रेमळ आणि नम्र स्वभावाचे असल्याने समाजातील अनेक व्यक्तीशी त्यांचा चांगला सलोखा आहे. मुलांचे शिक्षण आणि वाढती महागाई यामुळे त्यांना राहण्यासाठी चांगले घरसुध्दा बांधता आले नाही. आजही ते झोपडीवजा एका छोट्याशा छप्परात राहतात. बंगला, गाडी या गोष्टींमुळे ते श्रीमंत नसले तरी मुलांच्या शिक्षणामुळे समाजात आज श्रीमंत बनले आहेत. त्यांच्या कष्टाचे चीज होऊन स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे .हलाखीच्या परिस्थितीत मुलांना जिद्द व चिकाटीने उत्तम शिक्षण देऊन अधिकारी घडवणारा उच्चशिक्षित व अधिकारी शेतकरी पुत्रांचा शेतकरी बाप म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
शेतात केलेले कष्टाची जाण मुलांनी ठेवल. त्यातून आज मोठा मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाला. तीन मुले उच्चतम शिक्षण घेत आहेत. समाजात अनेक माणसांचा परिस स्पर्श लाभला त्यातून मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रेरणा मिळाली. केलेल्या कष्टाचे चिज झाले. मुलांनी उच्च शिक्षण व अधिकारी बनून समाजाची सेवा करावी.
सावकार मुलमुले, शेतकरी (कवठे येमाई)