यवत / राहुलकुमार अवचट : अतिशय विषम परिस्थितीला सामोरे जात समाजाकडून होणारा छळ, मानहानी यावर संयम ठेवत खचू न देता महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ खंबीरपणे उभी केली ती सावित्रीबाई फुले यांनी. त्यांनी सुरु केलेले कार्य आज तमाम महिला वर्गाचे सर्वांगीण जीवन संपन्न करण्याचे कार्य हा एक दीपस्तंभ आहे, असे महिला व बालकल्याण विभाग आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
दौंड तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती यांचे वतीने सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त महिला, सामाजिक कार्यकर्त्या व महिला शिक्षकांचा सन्मान समारंभ कस्तुरी गार्डन उरुळी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नारनवरे बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समितीचे अध्यक्ष भीमराव धिवार यांनी करत असताना समितीच्या ३०-३५ वर्षांच्या कार्याचा आढावा सादर करून केला. तर या कार्यक्रमास डॉ. नारनवरे आलेत हाच समिती कार्याचा गौरव असल्याचे नमूद केले.
यावेळी दौंड, हवेली, पुरंदर तालुक्यातील महिलासाठी विशेष कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्त्या व शैक्षणिक जबाबदारी सांभाळून मुलींच्या शिक्षणासाठी शाळाबाह्य उपक्रम राबवून काम करणाऱ्या विशेष शिक्षिका याचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, नवीन वर्षाची डायरी देऊन डॉ. नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्टीचे माजी संचालक रवींद्र चव्हाण हे होते.
यावेळी चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी महिला शिक्षण यांसह महिला हितासाठी कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्त्या यांचा सत्कार होतोय आणि तो ही गेली ३० ते ३५ वर्ष विधायक कार्य करणाऱ्या शाहू-फुले-आंबेडकर विचार प्रसार व काम करणारी संस्था करत आहे. ही बाबही विशेष आहे. महिलांनी असाच सावित्रीचा वारसा पुढे चालवावा, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष स्नेहल बाळ सराफ, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात,अजिंक्य चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महादेव कांचन, ऍड. अविनाश जगताप आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विजय शिंदे, उरुळी कांचन सरपंच भाऊसाहेब कांचन, एन. के. निंबाळकार, अशोक नाले, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दतात्रेय रोकडे यांनी केले तर आभार समितीचे सचिव कवी रा. वी. शिशुपाल यांनी मानले.