बापू मुळीक
सासवड : सासवड नगर पालिका कामगार कोऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी सविता सुनील जगताप, तर उपाध्यक्ष म्हणून आशा मिलिंद रणपिसे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी ए. एस बागवान यांनी ही बिनविरोध निवड जाहीर केली आहे. मावळते अध्यक्ष विकास राठोड यांचा कार्यकाल संपल्यामुळे या निवडी जाहिर करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे सोसायटीच्या 77 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.
सन 1947 साली स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेचे 1 कोटी 64 लाख भागभांडवल असुन सध्या ६० सभासद आहेत. पंधरा संचालक मंडळ असणाऱ्या संस्थेने चालू आर्थिक वर्षात दहा टक्के लाभांशासह भेटवस्तुही दिली आहे. नवनियुक्त अध्यक्ष सविता जगताप यांनी मागील पंचवार्षिक काळात उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या निवडीबद्दल माजी अध्यक्ष मोहन चव्हाण यांसह सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले.