पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट आता वेगळा लढणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा गड असलेल्या पुण्यातील राजकारणाला चांगलाच वेग आल्याचे दिसून येत आहे. शरद पवारांनी मला साथ दिली, तर मी जुन्नर विधानसभा निवडणूक लढवणार असं वक्तव्य काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर यांनी केले आहे. त्यामुळे अद्याप आपली नेमकी भूमिका जाहीर न केलेल्या आमदार अतुल बेनके यांना शरद पवारांनी राजकीदृष्ट्या घेरायला सुरूवात केल्याची जोरदार चर्चा आहे.
जुन्नरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके हे सध्या तरी तटस्थ आहेत. ते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटात वावरत असून ते नेमके कोणत्या गटात आहेत हे समोर आलं नाही. म्हणूनच की काय शरद पवारांनी त्यांच्यासमोर आता काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकरांच्या रूपाने पर्याय उभा केल्याची चर्चा आहे. जर मला पवारांनी ऑफर दिली तर मी नक्कीच जुन्नर विधानसभा लढवेल, असं शेरकर म्हणाले.
गेल्या तीन महिन्यांमध्ये शरद पवारांनी सत्यशील शेरकरांच्या विघ्नहर साखर कारखान्याला दोन वेळा भेट दिली. तसेच सत्यशील शेरकर यांनी जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. शेतकरी मेळाव्याला सत्यशील शेरकर हे पवारांच्या गाडीचे सारथी झाले होते, तेव्हा आमदार अतुल बेनके यांना मात्र गाडीत स्थान दिले गेले नव्हते. यानिमित्ताने शरद पवार हे शेरकरांना ताकद देत आहेत, अशीच चर्चा मतदारसंघात रंगलेली आहे.
सत्यशील शेरकर यांच्या माध्यमातून शेतकरी आणि युवकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. जुन्नर तालुक्यातल्या युवा वर्गात त्यांची चांगली क्रेझ आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारीची तालुक्यात चर्चा आहे. त्यामुळं शरद पवार जुन्नरमध्ये नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमदार अतुल बेनकेंना योग्य तो संदेश
जुन्नर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी आमदार अतुल बेनके हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. आपण कोणाच्याही गटात नाही, आपली निष्ठा फक्त पवार कुटुंबीयांसोबत आहे, असं जरी अतुल बेनके म्हणत असले तरी त्यांची अजित पवारांशी जवळीकता लपून राहिलेली नाही. त्यामुळेच शरद पवार या ठिकाणी नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत.