Satara News: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. विजय नगर परिसरातील गुहागर विजयपुरा राष्ट्रीय महामार्गावर एका मद्यधुंद महिलेने (Drunk Women) रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून गोंधळ घातला. ही घटना रात्री 8 च्या सुमारास घडली असून, त्या घटनेचे व्हिडिओ (Video) फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा– दहिसरमधील इमारतीला भीषण आग; आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची मोठी कसरत
मिळालेल्या माहितीनुसार, विजय नगर येथील MSEB चौकात एक मद्यधुंद अवस्थेत असलेली महिला अचानक रस्त्याच्या मध्यभागी येऊन मोठ्याने ओरडू लागली. तीनं मध्यभागी रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरु केला. काही वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रणामात त्रास सहन करावा लागला. राष्ट्रीय महामार्गावरील हा भाग नेहमीच वर्दळीचा असतो. त्यातच त्या वेळची वाढलेली वाहतूक पाहता वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावे लागले आणि रस्त्यावर मोठी कोंडी निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागला.
स्थानिक प्रवाशांनी आणि वाहनधारकांनी तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल करून घटनेची माहिती दिली. काही मिनिटांतच कराड शहर पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेवर नियंत्रण मिळवत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले आणि काही वेळात रस्ता पुन्हा खुला करण्यात आला.
या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी महामार्गावरील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले असून पोलिसांनीही या महिलेला रुग्णालयात वैद्यकीय तपासासाठी नेले.






