MahaRERA Update : नवं घर खरेदी करणार्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महारेराने नवीन घर करणार्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्यामुळे घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचा (‘रेरा’चा) नवा नियम (प्रमाणित कार्यप्रणाली) जारी झाला आहे. या नव्या नियमांमुळे विकासकांनी जर ग्राहकांना वेळेत नुकसानभरपाई किंवा त्यांची रक्कम परत केली नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई निश्चित झाली आहे. MahaRERA Update

‘रेरा’ प्राधिकरणाने आतापर्यंत दिलेले भरपाईचे आदेश अनेक विकासकांकडून दुर्लक्षित केले जात होते. ही गंभीर समस्या दूर करण्यासाठी, ‘रेरा’च्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास, ती रक्कम भू-महसुलाची थकबाकी मानली जाईल. ही थकबाकी वसूल करण्याचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डिफॉल्टर विकासकाची मालमत्ता जप्त करून, तिचा लिलाव करतील आणि त्यातून आलेली रक्कम ग्राहकांना नुकसानभरपाई म्हणून दिली जाईल.
‘रेरा’च्या या नव्या मानकामुळे घर खरेदीदारांना जलद न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून भरपाईसाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारणाऱ्या ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या कठोर नियमांमुळे बांधकाम व्यावसायिकांवर वेळेत भरपाई देण्याचे दडपण वाढले असून, त्यांना आता ‘रेरा’च्या आदेशांकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही. हा नियम बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाबदारीची भावना वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.







