बापू मुळीक
पुरंदर : महाराष्ट्र शासन आयोजित माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत सासवड नगरपालिकेने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. यामुळे पालिकेला तीन कोटी रुपयांचे पारितोषिक शासनाकडून मिळणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली. १ एप्रिल २०२३ ते १ मे २०२४ या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. २५ हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटामध्ये सासवडने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला.
या अभियानामध्ये सर्व सासवडकर नागरिकांचा सहभाग वाढविण्यास प्रथम प्राधान्य दिले. माझी वसुंधरा अभियानामध्ये मिळालेल्या पुरस्कारात आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, संकेत नंदवंशी, जावेद मुल्ला, पायल पोमण, शहर समन्वयक राम कारंडे, निखिल कांचन सर्व अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी व नागरिकांचे खऱ्या अर्थाने यश आहे. याच पध्दतीने देशपातळीवर स्वच्छतेबाबत सासवडचे नाव अग्रेसर ठेवू, असे मुख्याधिकारी डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
सासवड शहरास द्वितीय स्थान, तीन कोटींचे पारितोषिक मिळाले ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. माझी वसुंधरा अभियानामध्ये सासवड नगरपरिषदेने राज्यात द्वितीय स्थान मिळविल्याबद्दल आमदार संजय जगताप यांनी नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व सासवडकर नागरिकांचे अभिनंदन केले.