Sasvad News : सासवड, (पुणे) : फायनान्स कंपनीचा वसुली एजंट असल्याची बतावणी करून वाहनचालकांना दमदाटी करून लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सासवड पोलिसांनी एका टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीलाहि पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Sasvad News)
टिनु जगताप (रा. ताथेवाडी, ता. पुरंदर) व बोराडे (पूर्ण नाव माहीत नाही. रा. गराडे, ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल नेटके (रा. खानवडी, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Sasvad News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल नेटके हे छोटा टेम्पो चालवून उदरनिर्वाह करीत असतात. सासवडच्या जेजुरी नाक्यावर त्यांची गाडी टिनू जगताप आणि साथीदाराने अडवून टाटा फायनान्स कंपनीतून आल्याचे सांगत त्यांचा एक हप्ता थकीत असल्याने गाडी जमा करा, असे सांगितले. त्यावर नेटके यांनी गयावया करताच त्यांना धमकावून किमान ८ हजार रुपये भर असे सांगितले. नेटके यांनी गुगल पे वर पाठवतो, असे सांगितल्यावर कॅशच द्या, असे जगतापने सांगितले. (Sasvad News)
अखेर नेटके यांनी ५ हजार रुपये देऊन आपली सोडवणूक केली. मात्र, कंपनी किमान ३ हप्ते थकल्याशिवाय गाडी उचलत नाही हे लक्षात आल्याने नेटके यांनी टाटा फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीकडे चौकशी करून आपली गाडी उचलण्याचे आदेश आहेत का विचारले. मात्र, असे आदेश नाहीत आणि टिनू जगताप हे कंपनीचे एजंट देखील नाहीत अशी धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. दुसर्या दिवशी सासवडच्या भाजी बाजारात नेटके यांना गाठून जगताप याने पुन्हा धमकावले आणि मारहाण केली. (Sasvad News)
दरम्यान, नेटके यांनी सासवड पोलिसात याबाबत खंडणी आणि अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. ही मुले वसुली एजंट नसताना अनेक वर्षे तालुक्यात अशा स्वरूपाची वाटमारी करीत असल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत. (Sasvad News)