पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात वादग्रस्त ठरलेले ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. ठाकूर यांना दणका देत त्यांची अधिष्ठाता पदावरील नियुक्ती रद्द केली आहे.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हेच ड्रग्ज तस्कर ललित पाटीलवर उपचार करत होते. रुग्णालयातील मुक्काम वाढण्यासाठी स्वत: अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी वैद्यकीय अध्यक्षांना पत्र दिले होते. त्यात त्यांनी ललित पाटील याला टीबी हा आजार आणि पाठ दुखीचा आजार असल्याचं पात्रात नमूद केलं होत. राज्य शासनाच्या चौकशी समितीने अहवालात ससून प्रशासनावर ठपका ठेवला असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. ठाकूर यांची बदली किंवा निलंबन होण्याची शक्यता आधीपासूनच होती. या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने त्यांची नियुक्ती रद्द केल्याचा निकाल दिला आहे.
दरम्यान, ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची पदावरून तडकाफडकी बदली केली होती. त्यानंतर डॉ. ठाकूर यांची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली. माजी अधिष्ठाता डॉ. काळे यांनी या निर्णयाविरोधात ‘मॅट’कडे दाद मागितली होती. त्यानंतर 14 जुलै ला डॉ. काळे यांच्या बाजूने मॅटने निकाल दिला. मात्र, डॉ. संजीव ठाकूर यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याबाबत आज हायकोर्टाने तब्बल चार महिन्यांनी निकाल देत डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द करत त्यांना मोठा दणका दिला आहे. आता त्यांच्या जागी पुन्हा माजी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.