पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला ससून रूग्णालयात थांबण्यास मदत करणारे, अंमली पदार्थ विक्री प्रकरणात वादग्रस्त ठरलेले ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना राज्य सरकारने शुक्रवारी (ता. १०) पदमुक्त केले होते. त्याच दिवशी उच्च न्यायालयानेही डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द करून आधीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते. डॉ. काळे यांनी तातडीने अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
जानेवारी महिन्यात डॉ. काळे यांची बदली करून त्याजागी डॉ. ठाकूर यांची नियुक्ती केली गेली होती. त्यानंतर डॉ. काळे यांनी बदलीच्या विरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यामध्ये निकाल विरोधात गेल्यानंतर मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. त्यावरील सुनावणीमध्ये डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द ठरवली आहे. त्यामुळे डॉ. काळे यांची पुन्हा अधिष्ठातापदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाच्या निकालानुसार, डॉ. संजीव ठाकूर यांची बी. जे. अधिष्ठातापदावरून उचलबंगडी करण्यात आली आहे. पूर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची मध्यावधी बदली झाली होती. त्या विरोधात त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्याविरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात पुन्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. काळे यांच्या नियुक्तीचा आदेश अद्याप वैद्यकीय शिक्षण विभागाने काढलेला नाही. ससूनच्या अधिष्ठाता पदावरून त्यांची बदली करण्याचा आधीचा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केला होता. त्याचदिवशी अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील पलायन प्रकरणात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. ठाकूर दोषी आढळले. राज्य सरकारने डॉ. ठाकूर यांना पदमुक्त केले तर अस्थिव्यंगोपचार विभागातील पथक प्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित केले. त्यामुळे अधिष्ठातापद रिक्त झाल्याने डॉ. काळे यांनी तातडीने शनिवारी (ता. ११) या पदाचा कार्यभार स्वीकारला.
ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याप्रकरणी राज्य सरकारने चार जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर होते. या समितीने ललित पाटील प्रकरणात डॉ. ठाकूर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना दोषी धरले आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्राथमिक कारवाई करून खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी इतरही अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
ससूनचे अधिष्ठातापद रिक्त झाले होते. माझ्या नियुक्तीचा उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने मी अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारला आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा आदेश सोमवारी (ता. १२) निघणे अपेक्षित आहे.
– डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालय