दीपक खिलारे
इंदापूर : नुकत्याच झालेल्या इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारचे १५ सरपंच निवडून आल्याचा दावा केला होता. तो दावा आज भरणेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात फोल ठरला आहे. तसेच दत्तात्रय भरणे यांनी दावा केलेल्या गावातील सरपंचांनी त्यांना कोलीत दिले आहे, अशी टीका भाजप तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार यांनी केली
ते पुढे म्हणाले, गेल्या आठवड्यात इंदापूर तालुक्यामध्ये २६ ग्रामपंचायतचा पंचवार्षिक निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली १८ ग्रामपंचायत वरती निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १५ ग्रामपंचायती वरती सत्ता आल्याचा दावा परिपत्रक काढून केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा दावा गावगाड्यातील सरपंचांनी खोडून काढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी घेतलेल्या आजच्या कार्यक्रमांमध्ये सरपंच निवडून आल्याचा दावा केलेल्या ग्रामपंचायती पैकी केवळ ८ ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते. दत्तात्रय भरणे यांनी परिपत्रक काढून १५ ग्रामपंचायतवर दावा केला होता.
मात्र या १५ पैकी शिरसोडी, डाळज, हिंगणगाव, पडस्थळ या गावातील सरपंच उपस्थित राहिले नाहीत. तसेच जांब, कुरवली, म्हसोबाचीवाडी या तीन ग्रामपंचायती संमिश्र असून या ग्रामपंचायतीचे सरपंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. त्यामुळे दत्तात्रय भरणे हे तोंडघशी पडल्याचे स्पष्ट दिसले. भरणे यांच्या खोट्या बोलण्याने इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व भरणे यांच्या कामाला उतरती कळा लागली असल्याचे अॅड. जामदार यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोटी-कोटीची उड्डाणे घेणारे भरणे यांच्या कामाबाबत इंदापूर तालुक्यात प्रचंड नाराजी आहे. इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. भरणे यांच्या काळात इंदापूर तालुक्यात झालेल्या विकास कामे निकृष्ट झाल्याने ती कामे एका वर्षातच अखेरची घटका मोजत आहेत.
त्यामुळे इंदापूर तालुक्यात भरणे यांच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. भरणे हे केवळ तोंडापूरते गोड बोलून पाठीमागे खोड्या करणे आणि धांदाल पणे खोटे बोलणे एवढेच काम करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात भरणे यांना खोटे बोलण्याची किंमत मोजावी लागणार आहे, असे भाजप तालुकाध्यक्ष अॅड. जामदार यांनी नमूद केले.
गाव गावच्या सरपंचाला झाले दहा- दहा वेळा फोन
आज भरणेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात नवनियुक्त सरपंचांनी सहभागी व्हावे म्हणून भरणे यांनी स्वतः प्रत्यक गावच्या प्रत्येक सरपंचाला तब्बल दहा- दहा वेळा फोन केले आहेत. तरीही खोटे बोलणाऱ्या भरणे यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता भरणे यांच्या कार्यक्रमाला हजेरी न लावता उघड उघड दांडी मारली.
इंदापूर तालुक्यात भाजपची चलती
नुकत्याच झालेल्या २६ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तब्बल १९ जागा जिंकणाऱ्या भाजप या पक्षाचे वातावरण इंदापूर तालुक्यात आहे. तसेच तालुक्यातील सुज्ञ नागरिक आणि मतदारांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर सार्थ विश्वास ठेवला आहे. भविष्यात भरणे यांना इंदापूर तालुक्यातील जनता खड्यासारखी बाजूला करून भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अनुभवी व तालुक्याचा विकास करणाऱ्या नेत्याला स्वीकारणार आहे, असे भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार यांनी सांगितले.