पिंपरी : कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक ५ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेला आजपासून (दि.३) सुरुवात करण्यात आली आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र हे मुळशी, मावळ, खेड, शिरुर व हवेली तालुक्यांचे असून एकूण मतदार संख्या २२ हजार २५८ इतकी आहे. ५ एप्रिल रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडणारं असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पंवार यांनी दिली.
३ मार्च ते ७ मार्च २०२५ या कालावधीत शिवाजीनगर साखर संकुल येथे नामनिर्देशन पत्र विक्री व स्विकृती प्रक्रिया राबवली जाणार आहे. १० मार्च रोजी निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ ते २५ मार्च दरम्यान अर्ज मागे घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
२६ मार्च रोजी अंतिम यादी तसेच निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. ५ एप्रिल रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत २१ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ६ एप्रिल रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार आहे. उपनिबंधक मुकुंद पवार हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.