पुणे : समाजामध्ये श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. संत गाडगे बाबा यांचे अंधश्रद्धा निर्मूलन बाबतीतील कार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. त्याच प्रमाणे त्यांनी बहुजन समाजात शिक्षणाचा आग्रह धरला होता आणि शिक्षण हेच उन्नतीचे प्रथम साधन आहे असे सांगितले होते. हिंदू धर्मातील पवित्र अश्या कीर्तन परंपरेच्या माध्यमातून, सर्व सामान्य माणसाच्या भाषेत गाडगे बाबांनी केलेले प्रबोधन हे इतके प्रभावशाली होते की आजही त्याचा प्रभाव दिसून येतो, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
श्री संत गाडगेबाबा यांच्या १४७ व्या जयंती निमित्त सिंहगड रोड लॉण्ड्री असोसिएशन तर्फे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खडकवासल्याचे आमदार भिमराव तापकीर, विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री संजय मुद्राळे, उद्योजक अतुल जी चाकणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
समाजाच्या बांधणीमध्ये कीर्तनकार, प्रवचनकार यांचा वाटा सिंहाचा आहे, आजचे कीर्तनकार प्रवचनकार हे ज्या परंपरेचे पाईक आहेत त्या परंपरेचे मेरुमणी हे संत गाडगे बाबा होते. संत गाडगे बाबा यांचे कीर्तन केवळ भक्ती मार्ग सांगणारे नव्हते तर समाज जागृती करण्यासाठी प्रबोधन करणारे होते. संत गाडगे बाबा हे, स्वच्छता अभियान लोकसहभागातून राबवणारे एक अद्वितीय असे संत होते, असे आमदार भीमराव तापकीर बोलताना म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात हभप दादा महाराज पोकळे यांच्या कीर्तनाने झाली. कार्यक्रमावेळी संत गाडगेबाबांच्या मूर्तींचे मोफत वाटप करणारे मूर्तिकार सुरेश राऊत यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संघटनेचे अंकुश घोडके, सुहास पवार, अभिजित पारवे, शाम पवार, राजेंद्र कदम, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, केतन घोडके, पुरुषोत्तम गोपाळ, अनिकेत पवार, उमेश कनोजिया, रवी सपकाळे, निलेश उद्रकर, युवराज सोंडगे, मंगेश घोलप, मनोज पवार, मल्लिकार्जुन कुंभार, कार्यकर्ते तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीमा पवार यांनी मांडले तर अशोक रोकडे यांनी आभार प्रदर्शन केले.