पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी ते शिवबंधन बांधणार असून ठाकरे गटाकडून वाघेरे यांना मावळमधून उमेदवारी मिळण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा आहे. वाघेरे यांचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
सध्या महायुतीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले. त्यामुळे मागील दोन टर्म पासून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेल्या संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीच वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला होता.
बुधवारी संजोग वाघेरे यांना निरोप आला असून पक्ष प्रवेशासाठी शनिवारी मुंबईला बोलविण्यात आले आहे. त्यामुळे वाघेरे यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाने शिक्कामोर्तब केले असल्याची चर्चा आहे. वाघेरे घराणे पवार कुटुंबाशी एकनिष्ठ होते. संजोग वाघेरे यांनी महापौर, राष्ट्रवादीचे अध्यक्षपद भूषविले होते. पक्षातील फुटीनंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात होते. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठीच त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.